top of page
Search

श्री गुरुचरित्र – माहिती, महात्म्य आणि पारायण पद्धती


गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

गुरुचरित्र (कथासारासहित) ग्रंथ ऑनलाइन घरपोच मागवा - Order Online Now

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, "दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या."

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, "गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे."

सप्ताह पद्धती १ ला दिवस :- १ ते ९ अध्याय २ रा दिवस :- १० ते २१ अध्याय ३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय ४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय ५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय ६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय ७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।" अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम ◆ वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे. ◆ वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे. ◆ वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये. ◆ श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे. ◆ सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.) ◆ रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे. ◆ वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये. ◆ सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. ◆ सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते ? १. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते. २. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. ३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. ४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. ५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही). ६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. ७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. ८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले. ९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. १०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. ११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.


 
 
 

© Kardaliwan Seva Sangh, Pune 

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, Deccan Gymkhana, Pune - 411004      9657709678 / 9371102439 

bottom of page